रामनगर पोलिसांची धडक कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

Mon 15-Jun-2026,05:51 AM IST -07:00
Beach Activities

रामनगर पोलिसांची धडक कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

वर्धा | तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा

जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक चारचाकी वाहन, देशी-विदेशी मद्य व बिअरचा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मयूर प्रकाश मांद्रीले (वय २५, रा. स्नेहल नगर, वर्धा) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी पहाटे रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे जुनापाणी चौक पुलाजवळील सर्व्हिस रोडवर नाकाबंदी करण्यात आली.

पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला. पोलिसांनी २०० देशी दारूच्या शिश्या, विविध ब्रँडच्या बिअरच्या बाटल्या व कॅन तसेच संबंधित चारचाकी वाहन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६ लाख ५९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले यांच्या नेतृत्वात दारूबंदी पथकातील पोलीस कर्मचारी अविनाश बनसोड, मनोज भोमले, मुकेश वांदिले व विकी अणेराव यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.